कला
Art
संदेश भंडारे
मुक्त छायाचित्रकार
तमाशा, वारी-एक आनंद यात्रा, कुस्तीचा आखाडा, ब्राह्मण अशा महाराष्ट्राची वैशिष्ट्ये टिपणा-या विषयांवर फोटोबॉयोग्राफी करणारा मुक्त छायाचित्रकार म्हणून मानवी भावभावना टिपणारी असंख्य छायाचित्र प्रदर्शने आयोजित, तसेच याच विषयांवर ८ पुस्तके प्रकाशित. कारकिर्दीच्या सुरुवातीला काही वर्षे वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून काम केल्यानंतर, १७ वर्षांपूर्वी संदेश भंडारे यांनी मुक्त छायाचित्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली़ कला, संस्कृती, तसेच मानवी भावभावना टिपणा-या भंडारे यांच्या छायाचित्रांची मुक्त कंठाने प्रशंसा झाली़. पुण्यातील ब्राह्मण, त्यांची दिनचर्या, त्यांच्यात झालेले बदल या त्यांच्या पहिल्या पुस्तकालाही मोठा प्रतिसाद मिळाला़. महाराष्ट्रातील कानाकोप-यात फिरून तेथील परंपरा, संस्कृती आपल्या कॅमे-यातून टिपण्याचा प्रयत्न भंडारे यांनी वेळोवेळी केला़. वारी ही महाराष्ट्राची परंपरा़. या वारीतील असंख्य क्षण टिपणारे त्यांचे पुस्तक 'वारी एक आनंदयात्रा' आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या 'तमाशा' याविषयावर त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. गावोगावी फिरून त्यांनी तमाशा व त्यातील कलावंतांचा जीवनपट आपल्या छायाचित्रांतून मांडला. त्यासाठी त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती़. आता १५ वर्षांनी तमाशाच्या स्थितीचा ते फेरआढावा घेत आहेत. वारीवरील पुस्तकाच्या इंग्रजी आणि फ्रेंच आवृत्या प्रकाशित झाल्या असून, कन्नड आवृत्ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. बहुरूपी या कलेवरही त्यांच्या फोटोंची अनेक प्रदर्शने झाली. पॅरिस, बेनहाग-नेदरलँड्सपासून चेन्नईपर्यंत, कोलकात्यापासून कोचीपर्यंत आणि मुंबईपासून गोव्यापर्यंत असंख्य शहरांमध्ये त्यांची प्रदर्शने भरली आहेत. क्लिक या ग्रुपमार्फत दिल्ली, लंडन येथील प्रदर्शनात त्यांची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली होती़. चॉरिसमॅटिक कोल्हापूर, असा ही एक महाराष्ट्र, वारी- पिलग्रीम ऑफ जॉय, वारी एक आनंदयात्रा, मुंबई युनिव्हर्सिटी : ऑरनॉमेंट ऑफ दि सिटी, तमाशा एक रांगडी गम्मत, ब्राह्मण, पुणे -क्वीन ऑफ डेक्कन अशी ८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत़. पैलवान बनण्यासाठी मल्ल घेत असलेली मेहनत आणि त्यांचे जीवन यावर 'आखाडा' हे त्यांचे फोटो प्रदर्शन विविध ठिकाणी भरविण्यात आले होते़. कोनाड्यांसारख्या दुर्लक्षित विषयांवरही त्यांनी लेन्सच्या माध्यमातून अनोखा प्रकाशझोत टाकला. 'लाइफ ऑफ धारावी' या विषयाचे काम त्यांनी नुकतेच हातावेगळे केले आहे. महाश्वेतादेवी यांच्या कथेवर आधारित 'महादू' हा त्यांनी बनविलेला चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला. संदेश यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र फाउंडेशन (तमाशा), वर्ल्ड कप क्रिकेट : फोटोग्राफ ऑफ दि डे, ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट सोसायटी, दिल्ली, अलायन्स फ्रान्स यंग आर्टिस्ट अवॉर्ड, सार्क फेस्टिवल, पद्मश्री विखे-पाटील साहित्य पुरस्कार यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
संदीप मधुकरराव पिसाळकर
बॅचलर ऑफ फाइन आर्ट (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई), बॅचलर ऑफ फाइन आर्ट (गुलबर्गा), मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट (वडोदरा)
सामान्य कुटुंबातील मुलगा ते आंतरराष्ट्रीय चित्र-शिल्पकार अशी विलक्षण झेप, शिवाय उदयोन्मुख कलाकारांचा ‘युवा’ मार्गदर्शक, बहुआयामी कलाकार असा चित्र-शिल्पकलेतील ‘प्रेरणादायी’ प्रवास. संदीप पिसाळकर मूळचे यवतमाळचे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथेच झाले. घरची परिस्थिती सर्वसामान्य, लहानपणापासूनच चित्रकलेची आवड. या आवडीमुळेच त्यांनी चित्रकलेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर अमरावती व नागपूर येथे त्यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर, मुंबई येथील विख्यात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून २००५ मध्ये बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवी घेतली. २००६ मध्ये त्यांनी गुलबर्गा येथील एम.एम. के कॉलेजमधून बॅचलर ऑफ फाइन आर्ट ही पदवी घेतली. २००८ मध्ये वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट ही पदवी घेतली. चित्रकलेबरोबर शिल्पकलेत त्यांनी मोठे काम केले आहे. चित्रकलेचे शिक्षण घेतानाच, त्यांनी विविध प्रदर्शनांत भाग घेतला आहे. ३० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांच्या कलाकृती गाजल्या आहेत. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, एम.एम.के. कॉलेज गुलबर्गा, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, जहांगीर आर्ट गॅलरी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, बॉम्बे आर्ट सोसायटी, ग्रज्युएट स्टुडंट शो वडोदरा, बोधी आर्ट गॅलरी, वधेरा आर्ट गॅलरी दिल्ली, आर्ट गॅलरी मुंबई, रेलीगेर आर्ट गॅलरी नवी दिल्ली, अनंत आर्ट गॅलरी नवी दिल्ली, आर्ट गॅलरी नवी दिल्ली, इटरनॅशनल डॅनफूस आर्ट अवॉर्ड डेन्मार्क, रेड अर्थ गॅलरी वडोदरा, ओआयडी आर्ट गॅलरी कोची, बिर्ला अकॅडमी कोलकाता, श्राईन एम्पायर आर्ट गॅलरी नवी दिल्ली, एक्झिबिट ३२० गॅलरी नवी दिल्ली, फॅकल्टी ऑफ फाइन आर्ट वडोदरा, एस्सल म्युझियम ऑस्ट्रिया, ‘खोज’शो नवी दिल्ली, वाडफेस्ट शो या ठिकाणी त्यांच्या कलाकृतींनी प्रदर्शने गाजविली आहेत, तसेच २००९ मध्ये अमेरिकेतील साराटोगा व २०१० मध्ये वधेरा आर्ट गॅलरी दिल्ली येथे त्यांच्या कलाकृतींची सोलो प्रदर्शन झाली आहेत. पिसाळकर यांच्या कलाकृतींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये २००३-०५ जे. जे. स्कूल ऑफ आर्ट प्रदर्शन, २००५-महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन, २००६-आर्ट गॅलरी मुंबई, २००६-बॉम्बे आर्ट सोसायटी, २००८-कांस्य पदक, इटरनॅशनल डॅनफूस आर्ट अवॉर्ड डेन्मार्क, २००८-सुवर्ण पदक, इटरनॅशनल डॅनफूस आर्ट अवॉर्ड डेन्मार्क, २००८-बोधी आर्ट अवॉर्ड मुंबई, २००८-एफआयसीए-उदयोन्मुख कलाकार पुरस्कार नवी दिल्ली या पुरस्कारांचा समावेश आहे. संदीप यांनी वडोदरा, ग्वाल्हेर व शांतिनिकेतन येथे प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले आहे. देशातील अनेक नामांकित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात.
प्रभाकर पाचपुते
पेंटिंग आणि काष्ठशिल्प
ख-या अर्थाने कन्टेम्टरी आर्टिस्ट. १६ ते १७ देशात तेथील आर्ट गॅलरीतर्फे आमंत्रित. अनेक ठिकाणी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आणि विक्री. आजवर जर्मनी, फ्रांस, इंग्लंड, नेदरलेंड, टर्की, आस्ट्रेलिया, जापान, हांगकांग, इजराइल, इटली यासह १४ ते १५ देशांत आपल्या पेंटिंग, काष्ठशिल्प या कलेच्या प्रदर्शनासाठी गेले.
जन्म : सास्ती (ता. राजुरा) येथे
शिक्षण : १० व्या वर्गापर्यंत भद्रावती इथे बहिणीकड़े शिक्षण
तिथे अनुत्तीर्ण झाल्याने सास्ती येथील शाळेत पुनर्प्रवेश घेतला.
१२ वी पर्यंत शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे शिक्षण.
बीएफए- इंदिरा संगीत कला महाविद्यालय, खैरागड, राजनगाव, छत्तीसगढ़
एमएफए बडोदा येथे
२०१० ते २०१६ या काळात मुंबई इथे वास्तव्य
कौटुंबिक पार्श्वभूमी :
२ भाऊ, १ बहीण
एक भाऊ नागपूर क्रिकेट स्टेडियम येथे १९९५-९६ साली झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी.
वडील शेतकरी
भाऊ वेकोली मजूर
शिशिर सदाशिव शिंदे
फाइन आर्ट
समकालीन प्रयोगशील चित्रकार. सामाजिक जाणिवा समृद्ध असलेल्या या चित्रकाराने वेगवेगळे अनवट विषय चित्रांच्या माध्यमातून हाताळले आहेत. लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये पेंटिंगचे प्रात्यक्षिक. तिथे काढलेल्या भारतमाता चित्राची ६५ लाखांना विक्री. शिशिर शिंदे मूळचे नाशिक येथील. पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयातून शिक्षण. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात अनेक चित्रे प्रदर्शित. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला निवृत्तीप्रसंगी देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने खास चित्र बनवून घेतले. इस्रोच्या मंगळयान मोहिमेविषयी काढलेले चित्र बेंगळुरूच्या मुख्यालयात प्रदर्शित. युनोस्कोने २०१५ मध्ये खेडोपाडी वीज पोहोचविण्याच्या सुरू केलेल्या अभियानात चित्रांच्या माध्यमातून जनजागृती. मुंबईतील बलात्कार पीडित पत्रकार महिलेला जगण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेले चित्र तयार करण्याचा सन्मान. आजवर स्पर्धांमध्ये सहभागच घेत नसल्याने, त्यांच्या नावावर पुरस्कार नाही, परंतु असंख्य चित्रांच्या विक्रीतून लोकमान्यता.
संजीव गुरुलिंग संकपाळ
डिप्लोमा आर्ट.एज्यु. (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मुंबई), जी.डी.आर्ट (ड्रॉइंग अँड पेंटिंग), जी. डी. आर्ट (स्कल्प्चर)
चित्रकला आणि शिल्पकला या दोन्ही कला प्रकारांत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कॅनडा, फ्रान्स आणि जर्मनी देशात कला प्रदर्शने आयोजित करून, आपल्या विविधांगी कलाकृतींची प्रात्यक्षिके सादर केली आहेत. कोल्हापुरी स्कूलला परदेशात प्रसिद्धी देणारा कलाकार. परदेशातील कार्यशाळेत सहभागी होण्याचा सर्वप्रथम मान मिळविणारा युवा कलाकार. संजीव संकपाळ मूळचे कोल्हापूरजवळील निपाणी (जि.बेळगाव) येथील. चित्रकार होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच नजरेत असणा-या संजीव यांना कोल्हापुरातच कलाशिक्षण घ्यायचे होते. या ध्यासातूनच त्यांनी कोल्हापूरच्या दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथे जी. डी. आर्ट पदविका घेतल्यानंतर, त्यांनी कलामंदिर महाविद्यालयात शिल्पकलेतही राज्यात दुस-या क्रमांकाने पदवी मिळविली. सर्वोच्च शैक्षणिक पात्रतेनंतर, त्यांनी चित्रकलेबरोबरच शिल्पकलेतही मोठे काम केले आहे. चित्र-शिल्पकलेत विविध प्रयोग करत, विविधांगी शैलीत कलाकृतींची निर्मिती केली. त्यांच्या कलाकृतींनी केवळ देशभरातच नाही, तर विदेशातही लौकिक मिळविला आहे. भारतीय संस्कृती आणि कला जगभरात पोहोचविण्याचा त्यांचा ध्यास आहे. यासाठी त्यांनी अनेक प्रदर्शने देश-परदेशात भरविली आहेत. संकपाळ यांनी देशात मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, आर्टिस्ट सेंटर, आर्ट प्लाझा, गॅलरी आर्ट वर्क, जहांगीर आर्ट गॅलरी, बेळगावची मिलेनियम गॅलरी, बंगलोर येथील चित्रकला परिषद, कोलकाता येथील बिर्ला अकादमी, पुण्याची खुशबू आर्ट गॅलरी, सांगलीची अदिती आर्ट गॅलरी, गोवा, तसेच कोल्हापूरची गुलमोहर आर्ट गॅलरीसह अनेक स्पर्धा, प्रदर्शने गाजवली आहेत, तसेच त्यांनी दुबई, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी या देशातही कला प्रदर्शने, प्रात्यक्षिके सादर केली आहेत. त्यांना प्रतिष्ठेचा प्रफुल्ल डहाणूकर फाउंडेशन, लोक शिक्षण संस्कारमाला, कोल्हापूर, कलापुष्प सांगली, बॉम्बे आर्ट सोसायटी, व्ही. व्ही. ओक स्मृति प्रतिष्ठान, दक्षिण मध्य विभाग, नागपूर येथील विविध पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऐक्यासाठी दिल्लीच्या फ्रेंडशिप फोरम ऑफ इंडियातर्फे उत्कृष्ट सादरीकरण आणि सहभागासाठी सुवर्ण पदक मिळालेले आहे. या प्रेरणादायी कलाकर्तृत्वाला प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना श्यामकांत जाधव प्रतिष्ठानतर्फे चंद्राश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.