प्रशासन - आयपीएस - प्रॉमिसिंग
परमजीत सिंग दहिया, डीसीपी, झोन ९, मुंबई
मूळचे हरयाणाचे रहिवासी असलेले दहिया हे २००६ साली आयआरएस झाले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २००८ साली ते आयपीएस झाले. नांदेडमधून त्यांच्या धडाकेबाज कामगिरीला सुरुवात झाली. पुढे २०१६ मध्ये मुंबईतील महत्त्वपूर्ण अशा परिमंडळ ५च्या पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल त्यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. ५ मे २०१७ ला त्यांनी परिमंडळ ९ चा पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळला. परिमंडळ ९ मध्ये आल्यानंतर अमली पदार्थ विक्रेत्यांचे कंबरडे त्यांनी मोडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घातक ड्रग्ज, तसेच ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकलचे कारखाने त्यांच्या पथकांनी उद्ध्वस्त केले. रक्तचंदन तस्करी, एमडी, कोकेनसारख्या अमली पदार्थांच्या खरेदीविक्रीचे मुंबई कनेक्शन दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीला आले. शिक्षणाच्या बाजारीकरणाचा भाग असलेल्या २०१७-१८ मध्ये गाजलेल्या एसएससी पेपरगळती प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडवली होती. दहिया यांच्याच नेतृत्वाखाली त्या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. कोणताही सुगावा नसलेल्या आणि अवघ्या सहा हजार रुपयांसाठी घडलेल्या मॉडेल कृतिका चौधरी (२५) हत्याकांडाचा गुंता सोडविण्यासाठी आलेल्या यशामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. या प्रकरणाचा उलगडादेखील दहिया यांच्याच मार्गदर्शनात करण्यात आला. स्ट्रीट क्राईम रोखण्यावर त्यांचा विशेष भर असे. सोबत हायप्रोफाइल रॅकेटचाही पर्दाफाश त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. शिस्तप्रिय, धाडसी अधिकारी असलेले दहिया हे नेहमीच सहकाºयांसोबत मनमिळावूपणे वागत असल्यामुळे सहकाºयांमध्ये त्यांचा आदरयुक्त दरारा आहे.
एस. चैतन्य, जिल्हा पोलीस प्रमुख, जालना
जालना येथील पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुन्ह्यांना प्रतिबंध लावण्यावर विशेष भर दिला आहे. रात्रीची गस्त, अधिकाºयांना प्रशिक्षण, शांतता कमिटीच्या बैठकांसह गावगुंडांना हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. परिणामी २०१९ या वर्षात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. विशेषत: वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिल्याने अपघातांची संख्याही घटली आहे.
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य मूळचे तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथील रहिवासी. वडील, आजोबांचा उद्योग असला तरी कुटुंबातील एक सदस्य नागरी सेवेत असावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे एस. चैतन्य यांनी बीटेक इंजिनीअरिंग केल्यानंतर आयपीएसची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आले. मात्र, कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या पाठबळामुळे त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करीत आयपीएस परीक्षेत यश मिळविले. हैदराबाद येथील महात्मा गांधी पोलीस अॅकॅडमीत प्रशिक्षण झाले. प्रोबेशनरी अधिकारी म्हणून त्यांनी चंद्रपूर येथे काम पाहिले. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे व इचलकरंजी येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. तेथून कोल्हापूर येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. कोल्हापूर येथे असताना प्रसिद्ध कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा प्रारंभिक तपास एस. चैतन्य यांनी केला. त्यातील पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड याला ताब्यात घेतले. त्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त संजीव दयाळ यांनी पानसरे यांच्या खून प्रकरणाचा तपास लावण्यासाठी एसआयडी नेमली होती. त्याचाही एक सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर धुळे व तेथून नागपूर येथे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले.
जुलै २०१८ मध्ये जालना जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक म्हणून एस. चैतन्य यांनी सूत्रे हाती घेतली. गत दीड वर्षात पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल पोलीस दलाने केली आहे. परंतु येथील सराफा व्यापाºयाला लुटण्याच्या प्रयत्नातील आरोपींच्या मुसक्या आवळणे, जालना येथील सराफा व्यापाºयास मारहाण करून लुटणाºया सहा जणांना जेरबंद करणे, परतूर येथील कुंदन खंडेलवाल या युवकाच्या मारेकºयांना जेरबंद करणे, जालना येथील उद्योजक सिंघवी यांच्यावरील गोळीबार प्रकरणाचा लावलेला छडा, व्यापारी भानुशाली यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सहा तासात केलेली सुटका, अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आले आहे. अवैध धंद्यांविरुद्धची कारवाई सातत्याने सुरू आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा, पोलिसांकडून जागृतीसह कारवाई मोहीम यामुळे २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये प्राणांतिक अपघाताच्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात जवळपास १२ गावठी पिस्तूल जप्त करण्यात आल्या असून, गावठी पिस्तूल प्रकरणातील आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेषत: गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी रात्रीच्या गस्तीत वाढ, सर्वच अधिकारी, कर्मचाºयांना वेळापत्रकानुसार गस्त, गस्तीच्या वेळी वाहनांची तपासणी, शाळा-महाविद्यालयातील युवक-युवतींशी पोलिसांचा संवाद, गावस्तरावर बैठका, शांतता कमिटीच्या बैठकांमधून कायद्याची जागृती करून गुन्ह्यांचे प्रमाण घटविण्यासाठीही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
७७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा
खुनाच्या ३८ पैकी ३५ प्रकरणांचा उलगडा, खुनाच्या प्रयत्नातील सर्वच ६९ प्रकरणांचा उलगडा, अत्याचाराच्या ३९ घटनांचा उलगडा, दरोड्याच्या १० पैकी ८ घटनांचा उलगडा, जबरी चोरीच्या ९७ पैकी ५२, तर घरफोडीच्या २६३ पैकी ४६ घटनांचा उलगडा करण्यात आला आहे. याशिवाय इतर एकूण दाखल गुन्ह्यांपैकी ७७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा जालना पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष
कायदा-सुव्यवस्था सांभाळणाºया पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पोलीस वसाहतीत वॉटरफिल्टर प्लांट सुरू करण्यात आला आहे. वसाहतीतील रस्ते, स्वच्छतेवरही भर देण्यात आला आहे. अधिकारी, कर्मचाºयांची नेत्रतपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस प्रमुख, गडचिरोली
राज्याच्या दक्षिण-पूर्व टोकावरील जंगलव्याप्त, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभागाला काम करताना जीव मुठीत घेऊनच कर्तव्य बजावावे लागते. त्यातल्या त्यात नक्षलविरोधी अभियानात काम करणाºयांसाठी तर अतिसंवेदनशिल भागातील परिस्थिती देशाच्या सीमेवरील परिस्थितीपेक्षाही कणभर जास्तच जोखमीची असते. पण अशा स्थितीत कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचे मनोबल वाढवण्यासोबतच नक्षलवाद्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही याची खबरदारी घेणे, आणि नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा बसण्यासाठी योग्य असे नियोजन करण्याची जबाबदारी पोलीस दलाचे प्रमुख या नात्याने पोलीस अधीक्षकांना सांभाळावी लागते. गडचिरोलीचे विद्यमान पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पावणेदोन वर्षांपासून ही जबाबदारी लिलया पेलताना अनेक जहाल नक्षलवाद्यांना पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर अनेकांना अटक करण्यातही यश मिळविले आहे.
जून २०१८ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्यानंतर येथील नक्षलवाद्यांसोबतची युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा एकाचवेळी वापर करणे गरजेचे असते. नागरिकांचा विश्वास जिंकणे हा त्यातलाच एक भाग. बलकवडे यांनी नागरी कृती कार्यक्रमांतर्गत नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून पोलीस-नागरिक संबंधातून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे नक्षलवाद्यांना लोकांची साथ मिळणे दुरापास्त होऊ लागले. एकीकडे पोलिसांची नक्षलवाद्यांविरूद्ध आक्रमक भूमिका आणि दुसरीकडे नागरिकांची साथ मिळेनासी झाल्याने नक्षल चळवळीतून बाहेर पडणाºयांची संख्या वाढू लागली. गेल्या दिड वर्षात बलकवडे यांच्या रणनितीमुळे ४० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावरील एकूण बक्षीसांची रक्कम सव्वा कोटीपेक्षा जास्त होती. विशेष म्हणजे केवळ नक्षल चळवळीत काम करणारे साधे दलम सदस्यच नाही तर डिव्हीजनल कमिटी सदस्य, दलम कमांडर यासारख्या काही जहाल नक्षलवाद्यांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय २५ पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना अटक करण्यात त्यांना यश आले. त्यात प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस असणारे दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी मेंबर नर्मदा आणि तिचा पती सत्यनारायणा उर्फ किरण या मोठ्या नक्षली नेत्यांचाही समावेश आहे. बलकवडे यांच्या कार्यकाळात नक्षलवादी चळवळीत जाण्यापासून युवा वर्ग परावृत्त होऊन नक्षलवाद्यांची संख्या रोडावत आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या कार्यकाळातील हे यश त्यामुळेच दखलपात्र आहे.
डॉ. शिवाजी राठोड, प्रशासन, आयपीएस, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
डॉ. शिवाजी राठोड यांची ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अशी ओळख आहे. २३ वर्षांच्या पोलीस सेवेत त्यांनी विशिष्ट कार्यप्रणालीने सर्वसामान्य जनतेचे मन जिंकले. तेवढाच गुन्हेगारांवर धाकही निर्माण केला. ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ४५ नामचीन गुंडांच्या हद्दपारीचा, तर १० जणांवर मकोकाचा प्रस्ताव तयार केला. याशिवाय, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्या. ठाणे ग्रामीणमधील अनधिकृत धंदे आणि हाणामारी, तसेच मालमत्तेचे गुन्हे करणाºया टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ त्यांनी तयार केली. त्याद्वारे प्रत्येक विभागातील अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहापूर, मुरबाड, गणेशपुरी, मीरा रोड आणि भार्इंदर या पाच विभागांतील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक गंभीर गुन्ह्यांवर त्यांनी अंकुश निर्माण केला. ७०पेक्षा अधिक नामचीन गुंडांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले. ठाणे ग्रामीणमध्ये २०१८ पासून ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करून अनेक महिलांना न्याय मिळवून दिला. चोरी आणि जबरी चोरीतील एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा ऐवज ४५ फिर्यादींना डॉ. शिवाजी राठोड यांच्या हस्ते अलीकडेच सुपूर्द करण्यात आला. जबरी चोरीतील पदके आणि दोन लाखांची रक्कम पोलिसांनी परत केल्यानंतर लष्करातील माजी अधिकारी सनी थॉमस समाधान व्यक्त करतानाच भावुक झाले होते. गेल्या दोन वर्षांत तीन कोटी २२ लाख २१ हजार १७५ रुपयांचा गांजा, मेफेड्रीन, इफेड्रीन आणि चरस असे अमली पदार्थ त्यांच्या पथकांनी हस्तगत केले. अमली पदार्थ झिरो टॉलरन्स ही योजना राबवली. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अमली पदार्थविरोधात जनजागृती केली.
सोनसाखळी चोरीसाठी उत्तर प्रदेशातून ठाणे ग्रामीणमधील मीरा रोड आणि भार्इंदर भागात आलेल्या अजितसिंग याच्यासह त्याच्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आले. चोरीतील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह चार लाख ५१ हजारांचा ऐवज हस्तगत केला. वाहनांची चोरी करणाºया आंतरराज्य टोळीचा ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. सुनील चौरसिया याच्यासह सात जणांना यात अटक केली असून त्यांच्याकडून एक कोटी २० लाखांची महागडी वाहने हस्तगत केली.
तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सातारा
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव हे त्यांचे गाव. पुण्याच्या उपायुक्त (वाहतूक नियंत्रण) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्या विभागाचा कार्यभारही अतिशय सकारात्मकतेने सांभाळला. त्यांनी पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अनेक प्रयोग राबविले. त्यामध्ये त्यांनी एकदा कात्रज ते शिवाजीनगर या दहा किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीस्वारांना एकाच वेळी सोडले. त्यापैकी एकाला ट्रॅफिक सिग्नल पाळण्यास सांगितले. तर एकास ट्रॅफिक सिग्नल तोडण्यास सांगितले. तेव्हा दोघांमध्ये केवळ चार मिनिटांचा फरक पडला. हा प्रयोग केल्यानंतर त्यांनी नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा, हा संदेश दिला. तसेच चार मिनिटांसाठी आपले अनमोल आयुष्य धोक्यात घालता का? हे अभियान राबविले.
साताºयातही रुजू झाल्यानंतर त्यांनी अनोखे प्रयोग राबविलेत. वाहनांची कागदपत्रे तपासताना पोलीस आणि नागरिकांमध्ये वारंवार वादावादीचे प्रसंग घडत होते. त्यामुळे वाहनांची कागदपत्रे तपासू नका, असा आदेश त्यांनी कर्मचाºयांना दिला. या अनोख्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले. माजी सैनिकांच्या अडीअडचणींसाठी महाराष्ट्रातील पहिला मेळावा त्यांनी साताºयात सुरू केला. या मेळाव्याला माजी सैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोलीस कर्मचाºयांसाठी अत्याधुनिक कॅन्टीन सुरू केले. जेणेकरून एकाच छताखाली कर्मचाºयांना चांगल्या दर्जाचे साहित्य मिळेल, याचा त्यांनी विचार केला. शंभरहून अधिक गुन्हेगारांना त्यांनी हद्दपार केले. महिला सुरक्षित आणि निर्भय व्हाव्यात, यासाठी त्यांनी वॉकथॉन स्पर्धा आयोजित केली. साताºयातील महिला रात्री बारा वाजता निर्भयपणे घरातून पहिल्यांदाच बाहेर पडल्या. या उपक्रमाला जिल्ह्यातून सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी आगळ्यावेगळ्या संवाद मेळाव्याचे आयोजन केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये दरी निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा अनोखा मेळावा आयोजित केला. तब्बल बारा वर्षांनंतर जिल्हा पोलीस दलाने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली. याशिवाय बीट मार्शलसाठी नव्या अत्याधुनिक २५ दुचाकी जिल्हा पोलीस दलामध्ये सक्रिय केल्याने चोºया, घरफोडी रोखण्यास मदत झाली. पारधी समाजातील लोकांवर गुन्हेगारीचा ठपका ठेवला जातो. या लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी तेजस्वी सातपुते यांनी पारधी समाजातील लोकांचा मेळावा आयोजित केला.