चित्रपट (पुरुष)
अंकुश चौधरी - ट्रिपल सीट
एक नायक आणि दोन नायिका असा प्रेमाचा त्रिकोण हिंदी व मराठीत आपण कित्येक वेळा पचवला आहे. त्यामुळे एका चौकटीतली 'ट्रिपल सीट' ही प्रेमकथा आहे. अंकुश चौधरीला असा नायक साकारण्याची संधी देणारा 'ट्रिपल सीट' त्याच्या हलक्याफुलक्या मांडणीमुळे रंजक झाला आहे. लव्हेबल कॅरेक्टर करणे ही तर अंकुशची ख्याती आहे. अंकुशला त्याचे चाहतेही नेहमीच या भूमिकेत पाहणे पसंत करतात. अशा भूमिका तो चोख बजावतो, त्यामुळे या सिनेमातही त्याने अगदी सहजपणे त्याच्या शैलीत कृष्णा हे पात्र रंगवले आहे. आदर्श प्रेमी, एका मिसकॉलमुळे होणारा गोंधळ अंकुशने आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत साकारला आहे.
हा सिनेमा २५ ऑक्टोबर २०१९ ला रीलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. या सिनेमाने ७६ लाख रुपयांची कमाई केली.
अमेय वाघ - गर्लफ्रेंड
आजच्या काळातील नचिकेत हे पात्र अमेय वाघने 'गर्लफ्रेंड' या सिनेमात साकारले आहे. आजच्या काळात गर्लफ्रेंड नसणे, कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नसणे, याचा तरुणांवर सामाजिक दबाव आहे. कुटुंबाकडून, मित्रमैत्रिणींकडून, कामकाजाच्या ठिकाणचे सहकारी किंवा समाजाकडून आणि अर्थात स्वत:कडूनही तो दबाव तेवढाच असतो. आजच्या सोशल मीडियाच्या 'नेटवर्क'युक्त जमान्यात आपले रिलेशनशिप स्टेटस जाहीर करावे लागत असल्याने हा दबाव काहीसा अधिकच आहे. अशावेळी खोटे खोटे का होईना, आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे दाखविण्यासाठी कोणाचेही नुकसान होणार नाही असे फेसबुकवर खोटे अकाउंट काढून आजचा एक तरुण नचिकेत (अमेय वाघ) आपण रिलेशनशिपमध्ये आहोत हे स्वत:च मेसेज पाठवून जगाला भासवत राहतो. स्वत:ही या आभासी व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात असतो. आपल्याला गर्लफ्रेंड नाही म्हणून कुढत न राहणारा 'नचिकेत' अमेयने आपल्या देहबोलीने उत्तम साकारला आहे. 'फास्टर फेणे'मधला तरबेज अमेय वाघ आणि त्याच्या बरोबर उलट असलेले नचिकेतचे पात्र अमेयने आपल्या संवादफेकीतून आणि अभिनयाने अतिशय उत्तम वठवले आहे.
हा सिनेमा २६ जुलै २०१९ ला रीलीज झाला. या सिनेमाने आत्तापर्यंत ८० लाख रुपयांची कमाई केली.
भाऊ कदम - नशीबवान
या सिनेमात भाऊने महानगरपालिकेत सफाई कर्मचारी असलेल्या बबनची भूमिका साकारली आहे जो रोजच्या दैन्यावस्थेला कंटाळलेला असतो. अपुऱ्या पगाराची नोकरी, अपुरी जागा आणि वर चाळीतल्या छोट्या जागेसाठी घेतलेले पैशांच्या हप्त्यांसाठी पतपेढीने लावलेला तगादा. कुणीही माणूस हैराणच होईल अशा परिस्थितीने. पण बबनचं नशीब अचानक फळफळतं... एक दिवस, तो एका इमारतीत गटार साफ करायला जातो. गटार साफ करता करता तो हातातला झाडू एका भिंतीवर ठोकतो, तर भिंतीतील विटेचा एक तुकडा सहज खाली गळून पडतो. त्यानंतर तो सहज आत डोकावून पाहतो तर काय... जणू त्याचं नशीबच समोर उभं असतं त्याच्या स्वागतासाठी हात पसरून. बबन त्या नशिबाला सामोरा जातो आणि त्याची भरभराट सुरू होते... भाऊने हतबल असलेला बबन आणि भरभराट झाल्यानंतरचा श्रीमंत बबन ह्यातील फरक आपल्या अभिनयाने उत्तम उभा केला आहे.
हा सिनेमा ११ जानेवारी २०१९ ला रीलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. या सिनेमाने फक्त २७ लाख रुपयांची कमाई केली.
चिन्मय मांडलेकर - फत्तेशिकस्त
फर्जंद सिनेमाप्रमाणेच 'फत्तेशिकस्त' सिनेमातही चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. आपल्या भूमिकेतून छत्रपती शिवरायांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन प्रेक्षकांसमोर उभे केले. 'फत्तेशिकस्त' हा चित्रपट शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने फत्ते केलेल्या थरारक मोहिमेवर आधारित आहे. चित्रपट पाहताना शिवकालीन रोमांचकारी सर्जिकल स्ट्राइकची आठवण महाराष्ट्राला झाली. चिन्मय मांडलेकरने महाराजांनी इतिहासात केलेला पहिला सर्जिकल स्ट्राइक आपल्या अप्रतिम अभिनयामुळे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
हा सिनेमा १५ नोव्हेंबर २०१९ ला रीलीज झाला. या सिनेमाने तब्बल ९ कोटी रुपयांची कमाई केली.
ललित प्रभाकर - आनंदी गोपाळ
'आनंदी गोपाळ' कादंबरीवर आधारित या सिनेमात ललित प्रभाकरने गोपाळराव जोशींची भूमिका रंगवली आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाईने घराबाहेर पडणे, शिकणे, एवढेच काय स्वत:च्या नवऱ्यासोबत बाहेर फिरणेदेखील धर्म बुडविण्याइतके जहाल मानले जायचे. पण हे सारे गोपाळराव जोशी नावाच्या एका माणसाने आपल्या बायकोच्या संदर्भात केले. तिला उंबरठा ओलांडायला लावला, एवढेच नाही तर, आधी तिला स्वत: शिकवून पुढे अमेरिकेतही वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवले तेही एकटीला. आपल्या बायकोला शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी त्या काळातील समाजाच्या विरुद्ध उभे राहणे हे ललित प्रभाकर या अभिनेत्याने अतिशय उत्तमरीत्या साकारले आहे.
हा सिनेमा १५ फेब्रुवारी २०१९ ला रीलीज झाला. या सिनेमाने आत्तापर्यंत ११ कोटी रुपयांची कमाई केली.