क्रीडा
आकाश चिकटे, हॉकीपटू - यवतमाळ
२०१९ साली देशांतर्गत हॉकी स्पर्धेत आकाश चिकटेने हॉकीपटंूचे लक्ष वेधले. चेन्नई येथे झालेली गोल कप, बंगळूरु कप, जालंदर येथील सुरजित हॉकी स्पर्धा या स्पर्धा गाजवतानाच आकाशने सर्विसेस कंट्रोल बोर्ड संघाचे नेतृत्व करताना आपल्या संघाला नेहरू चषक वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे सुवर्णपदक मिळवून दिले.
भारतीय हॉकी संघाचा भरवशाचा गोलरक्षक असलेला आकाश यवतमाळचा सुपुत्र आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाºया आकाशने आपल्या हॉकी कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यात यश मिळवले. अनेक देशांतर्गत स्पर्धेत भक्कम गोलरक्षणाद्वारे लक्ष वेधलेल्या आकाशने २०१६ साली भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २०१८-१९ साली केलेल्या चमकदार खेळामुळे नुकताच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्याचा राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मान झाला.
आशिया चषक स्पर्धेत आपली विशेष छाप पाडलेल्या आकाशने सर्वोत्तम गोलरक्षकाचा मान मिळवला. याशिवाय भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी लीग स्पर्धेतील कांस्य पदक विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश होता. आपल्या भक्कम गोलरक्षणाच्या जोरावर त्याने देशाचा दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेशपुढेही नवे आव्हान निर्माण केले. आता आगामी २०२० वर्षासाठी त्याने स्वत:ला सिद्ध केले असून, राष्ट्रीय संघाच्या सराव शिबिरात स्थान मिळवण्याचे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. या शिबिरात स्थान मिळाल्यास राष्ट्रकुल, जागतिक लीग आणि आॅलिंपिक स्पर्धांमध्ये छाप पाडण्याचा निर्धार आकाशने बाळगला आहे.
हर्षवर्धन सदगीर, कुस्तीगीर - नाशिक
२०१८ मध्ये राजस्थान आणि हरयाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या हर्षवर्धन सदगीरने २०१९ वर्ष अक्षरश: गाजवले. त्याने आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय स्पर्धेत १३० किलो वजनी गटातून सुवर्ण पदक पटकावले. यानंतर त्याने पुणे महापौर केसरी आणि चंद्रपूर महापौर केसरी किताब असे सलग दोन मानाचे किताब पटकावत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. तसेच २०२० वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत हर्षवर्धनने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
दिग्गज कुस्ती वस्ताद काका पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या हर्षवर्धन सदगीरने यंदाची प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी गदा पटकावण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे अंतिम लढतीत आपल्याच तालमीतील मल्ल आणि आपला अत्यंत जवळचा मित्र असलेल्या शैलेश शेळके याला नमविले आणि त्यानंतर त्याला आपल्या खांद्यावर घेत हर्षवर्धनने खिलाडूवृत्तीचे उदाहरण दिले. यामुळे सर्वच क्रीडाप्रेमींनी महाराष्ट्र केसरी जेतेपदापेक्षा दाखविलेल्या खिलाडूवृत्तीसाठी हर्षवर्धनचे कौतुक केले.
महाराष्टÑ केसरी किताब पटकाविल्यानंतर हर्षवर्धनने आता हिंद केसरी किताब पटकाविण्याचे प्रमुख लक्ष्य आहे. तसेच, त्यापुढे जाऊन राष्टÑकुल आणि आॅलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे लक्ष्य हर्षवर्धनने बाळगले आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज, महिला क्रिकेटर - मुंबई
२०१९ साली जेमिमाने क्रिकेट विश्वात छाप पाडताना आॅस्टेÑलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या देशांविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघात सलामीवीराची जबाबदारी पार पाडणारी जेमिमा टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या मधल्या फळीला मजबुती देत आहे. तिच्या जोरावरच भारताने २०१८-१९ व २०१९-२० या मोसमामध्ये न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघांविरुद्धच्या एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.
५० षटकांच्या क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम करणारी जेमिमा, भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधनानंतर केवळ दुसरी फलंदाज. नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबईकडून औरंगाबाद येथे सौराष्ट्रविरुद्ध जेमिमाने १६३ चेंडूंत २१ खणखणीत चौकारांसह २०२ धावांचा तडाखा देत, पहिल्यांदा भारतीय क्रिकेटचे लक्ष वेधले. २०१८ फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांच्या दौºयासाठी जेमिमाची भारतीय संघात पहिल्यांदा निवड झाली होती. त्याचप्रमाणे, मार्च २०१८मध्ये जेमिमाने आॅस्टेÑलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मुंबई उपनगरातील भांडुप येथे जन्मलेल्या जेमिमाला दोन भाऊ. वयाच्या चौथ्या वर्षी जेमिमाने प्रथम बॅट पकडली. यानंतर जेमिमाच्या क्रिकेटसाठी वडील आयवन रॉड्रिग्ज यांनी बांद्रा परिसरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटचे धडे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गिरवलेल्या जेमिमाने पुढे देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. क्रिकेटव्यतिरिक्त जेमिमाने हॉकीमध्येही आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. महाराष्ट्राच्या १७ आणि १९ वर्षांखालील हॉकी संघात जेमिमाने स्थान मिळवले होते. टी२० मालिकांमध्ये भारताने दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मिळवलेल्या मालिका विजयांमध्येही जेमिमाचे योगदान महत्त्वाचे होते. टी२० विश्वचषक स्पर्धेआधी आॅस्टेÑलियात झालेल्या तिरंगी टी२० स्पर्धेत भारताने मिळवलेल्या उपविजेतेपदामध्ये जेमिमाने लक्षवेधी कामगिरी केली.
रिशांक देवाडिगा, कबड्डीपटू - मुंबई
गेल्या वर्षभरात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर रिशांकला २०१८-१९ या कालावधीतील महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. स्टार कबड्डीपटू असलेला रिशांक देवाडिगा प्रो कबड्डीच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. यू मुम्बाकडून चमकल्यानंतर सध्या यूपी योद्धा संघाकडून रिशांक आपली छाप पाडत आहे. अत्यंत आक्रमक खेळाडू असलेला रिशांक खोलवर चढायांसह भक्कम बचावासाठीही ओळखला जातो. आपल्या नेतृत्वाखाली त्याने महाराष्ट्राला राष्ट्रीय जेतेपद पटकावून दिले आहे.
२०१८-१९ मध्ये दुबई येथे झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात रिशांकचे योगदान मोलाचे ठरले. त्याचप्रमाणे जकार्ता येथे झालेल्या १८व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रिशांक चमकला. याशिवाय रोहा येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसह प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमातही रिशांकने आपल्या अष्टपैलू खेळाची चमक दाखवली आहे. प्रो कबड्डीमध्ये यूपी योद्धा संघाने ६१ लाख रुपयांची बोली लावत रिशांकला आपल्या संघात कायम ठेवले.
२०२० सालीदेखील आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचा निर्धार केलेल्या रिशांकचे मुख्य लक्ष्य यंदा होणारी विश्वचषक स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळताना इराण, कोरियासारख्या तगड्या संघांविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास रिशांक कठोर मेहनत घेत आहे. याशिवाय प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या सत्रातही आपला दबदबा निर्माण करण्यास रिशांक सज्ज होत आहे.
ाहू माने, नेमबाज - कोल्हापूर
वयाच्या सोळाव्या वर्षी यूथ आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले रौप्यपदक मिळवून देण्याचा पराक्रम कोल्हापूरच्या शाहू तुषार माने याने केला आहे. २०१६ मध्ये युवा राष्ट्रीय अजिंक्यपद मिळवल्यानंतर त्याची थेट भारताच्या संभाव्य संघामध्ये निवड झाली. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय निवडचाचणी स्पर्धेतही अव्वल कामगिरी केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत एक सुवर्ण व एक कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे भारताला यूथ आॅलिम्पिकचा कोटाही मिळाला. याच निवडीवर त्याने अर्जंेटिना येथे झालेल्या तिसºया यूथ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली.
२०१९ या वर्षामध्ये आपली विशेष छाप पाडलेल्या शाहूने जर्मनीच्या हॅनोव्हर येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत सुवर्णवेध घेतला. यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही शाहूने एक सुवर्ण व एक कांस्य पदक मिळवले. या शानदार कामगिरीच्या जोरावर २० मार्च २०२० रोजी दिल्ली येथे होणाºया विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी शाहूने भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आतापर्यंत त्याने १० आंतरराष्ट्रीय पदकांसह ५२हून अधिक पदके मिळविली आहेत.