रंगभूमी (स्त्री)
लीना भागवत - आमने सामने
लीना भागवत यांनी 'आमने सामने' या नाटकात नीलिमाताई ही भूमिका साकारली आहे. नीलिमाताई यांच्या वरकरणी सुखी संसारातील अदृश्य ताण अधिक वास्तवदर्शीपणे लीना भागवत यांनी साकारले आहेत. उभयतांतली नि:शब्द, परंतु बोलकी अस्वस्थता, बेचैनी जास्त सखोलतेने लीना भागवत यांनी रंगमंचावर साकारली आहे.
या नाटकाचा पहिला प्रयोग ३१ ऑक्टोबर २०१९ ला पार पडला. आत्तापर्यंत याचे ५३ हून अधिक प्रयोग झाले आहेत.
निर्मिती सावंत- व्हॅक्यूम क्लीनर
निर्मिती सावंत यांनी ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकात नयनाची (दुहेरी) भूमिका साकारली आहे. नयनाची स्त्रीसुलभ संयमी, संशयी वृत्ती एकीकडे आणि रंजनच्या रूपात सारी बंधने झुगारून मनमुक्त जगण्याचे परमिट मिळालेली नयना दुसरीकडे. लिंगबदलाचा हा मामला त्यांनी हुकमीरीत्या साकारला आहे.
हे नाटक ९ जानेवारी २०१९ ला व्यावसायिक रंगभूमीवर आले. याचे आत्तापर्यंत २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
प्रतीक्षा लोणकर - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
प्रतीक्षा लोणकर यांनी ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकात आजच्या काळातील स्त्री (इरा) ताकदीने व सहजतेने उभी केली आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोषाबद्दल अनभिज्ञ असलेली इरा आईच्या एका निर्णयाने खाडकन जागी होते. भानावर येते. आपण तिला किती गृहीत धरत होतो, या जाणिवेने तिला तिची चूक उमगते. एवढेच नव्हेतर, सर्वांनाच आपण कसे वेठीस धरत आलो आहोत, हा साक्षात्कार इरासाठी नवाच असतो. टोकाची स्वार्थी इरा, प्रतीक्षा लोणकर यांनी आपल्या बोलण्या-वागण्यातून समर्थपणे उभी केली आहे.
हे नाटक १४ डिसेंबर २०१९ ला रंगभूमीवर आले. या नाटकाचे आत्तापर्यंत ७० प्रयोग झाले आहेत.
शृजा प्रभुदेसाई - हिमालयाची सावली
शृजा प्रभुदेसाई यांनी ‘हिमालयाची सावली’ या नाटकात बयोची भूमिका साकारली आहे. बयोचा बोलभांड स्वभाव, तिचे करारीपण उत्तम दाखवले आहे. बयोचा तोंडाळपणा, त्याचवेळी पोटात दडलेली मायेची ओल, आयुष्यभर टक्केटोणपे खाल्याने अनुभवांतून आलेले व्यावहारिक शहाणपण, उत्तरार्धात मुलांच्या कर्तृत्वामुळे तिला लाभलेले निवांतपण, त्याचदरम्यान नानासाहेबांना त्यांच्या संस्थेतून एक प्रकारे हकालपट्टी केली गेल्याने नवºयाची बाजू घेऊन तिचे आक्रमक होणे असे असंख्य भावनिक क्षण शृजा प्रभुदेसाई यांनी प्रभावीपणे अभिव्यक्त केले आहेत.
रविवार २९ सप्टेंबर २०१९ ला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. हे तीन अंकी नाटक आहे. ज्याचे आत्तापर्यंत ९० प्रयोग पार पडले आहेत.
वंदना गुप्ते - हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
वंदना गुप्ते यांनी ‘हरवलेल्या पत्यांचा बंगला’ या नाटकात सोशिक, पारंपरिक मानसिकतेत अडकलेली आई साकारली आहे. वंदना गुप्ते यांनी तिच्या सततच्या अवघडलेपणातून आणि नि:शब्देतून पुरेपूर पोहोचवली आहे. खरेतर, त्यांच्या उपजत व्यक्तिमत्त्वाशी हे पात्र विसंगत आहे. तरीही त्यांनी या व्यक्तिरेखेचे सगळे कंगोरे आत्मसात करून ती उत्तमरीत्या वठवली आहे. शेवटी त्यांना आलेले आत्मभान आणि त्यातून त्यांनी घेतलेला निर्णय नाटकाचा उत्कर्षबिंदू ठरतो.
हे नाटक १४ डिसेंबर २०१९ ला व्यावसायिक रंगभूमीवर आले. या नाटकाचे आत्तापर्यंत ७० प्रयोग झाले आहेत.