लोकसेवा - समाजसेवा
दीपक नागरगोजे /शांतिवन / बीड /अनाथ व नको असलेल्या मुलांचे हक्काचे घर
'शांतिवन' आश्रमाची २००० मध्ये सुरुवात झाली. मुलांचे संगोपन आणि शिक्षणासाठी सुरू केलेल्या या प्रकल्पात हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रातील वंचित बालकांसाठी काम सुरू झाले. ५० अनाथ मुलांसाठी सुरू झालेला हा प्रकल्प आज ३५० निवासी आणि ६५० अनिवासी अशा १००० वंचित बालकांचे पालन-पोषण, संगोपन आणि शिक्षणाचे कार्य करीत आहे. या प्रकल्पाची सुरुवात झाली, ती बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून. आनंदवन येथे दीपक नागरगोजे हे १९९५ साली गेले होते. ‘‘पर्यटक म्हणून या आणि परिवर्तक म्हणून जा.’’ या बाबांच्या वाक्याने प्रभावित झालेल्या दीपकने १९९८ ला स्वत:ची सामाजिक संस्था स्थापन केली. दोन वर्षे संस्थेच्या उभारणीत गेली. पाहता-पाहता या संस्थेला मोठे स्वरूप आले आहे. अनाथ, वेश्यावस्तीत काम करणाऱ्या महिलांची, तमाशा कलावंतांची, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची, कैद्यांची, ऊसतोड कामगारांची, भीक मागणाऱ्यांची, टाकून दिलेली अशी वेगवेगळी मुले 'शांतिवन'मध्ये आणली जाऊ लागली. या प्रकल्पात शिक्षण घेऊन मोठी झालेली मुले वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी असे प्रतिष्ठेचे आणि समाजोपयोगी शिक्षण घेत आहेत आणि कितीतरी मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन समाजात यशस्वी पुनर्वसन झाले आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासन दरबारी लढा देऊन 'शांतिवन'च्या धर्तीवर हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी दीपक यांनी शासनास भाग पाडले. मराठवाड्यातील दुष्काळ निर्मूलन कसे व्हावे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील, यासाठी आर्वी गावात शेतकरी मनोबल प्रकल्पाची स्थापना करून या दुष्काळग्रस्त गावात नदी खोलीकरण, बंधारा, शेत तलाव आदी सिंचनाची कामे करून ५०० एकर जमीन बारा महिने ओलिताखाली आणली. यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी मोसंबी, डाळिंब, भाजीपाला, मासे, कलिंगड, फुलशेती करून स्वावलंबी झाले. वंचित बालकांचे केवळ १८ वर्षांपर्यंत संगोपन करून न थांबता त्याला स्वत:च्या पायावर उभा करेपर्यंत त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा नवीन पायंडा या संस्थेने पार पाडला आहे. आजपर्यंत ५०० पेक्षा अधिक वंचित मुलांचे स्वत:च्या पायावर उभे राहून समाजात यशस्वी पुनर्वसन झाले आहे. १२ विद्यार्थी 'एमबीबीएस'चा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. अशी यादी खूप मोठी आहे.
डॉ. गिरीश कुलकर्णी /स्नेहालय /अहमदनगर/ ३१ वर्षे वेश्यांचे पुनर्वसन, एड्सग्रस्त मुलांचे संगोपन देह व्यापारातील मुलं, मुली आणि महिलांना डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी स्वत:च्या स्नेहालयात आणून ‘त्या’ व्यवसायातून दूर केले, अशांची संख्या १५००० आहे. ५०० महिलांचे त्यांनी पुनर्वसन करत त्यांना चांगले व्यवसाय, नोक-या दिल्या. एड्स झालेल्या किंवा या व्यवसायातून आलेल्या आजारपणातून अनेक महिला व एड्सग्रस्त त्यांच्या संस्थेत आस-याला यायचे. आजवर अशा १२०० महिला व ४०० च्या आसपास मुलांचे मृत्यू या संस्थेने पाहिले व त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. आज या संस्थेत एड्स झालेले २५० च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत तर वसतिगृहात ३०० च्या आसपास मुलं-मुली यातून बाहेर पडण्यासाठी येथे आले आहेत. सध्या या संस्थेचे वेगवेगळे २२ प्रकल्प आहेत. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत येता-जाता देहविक्रय करणा-या महिला त्यांना दिसायच्या. ते पाहून स्वत: काही केले पाहिजे ही शिकवण त्या वयात मिळाली आणि पुढे महाविद्यालयात गेल्यावर मित्राचीच आई आणि बहीण देहविक्री करताना पाहून ते हादरले. वेश्यावस्तीत काम करणाºया महिलांना त्यांची मुलं सायंकाळच्या वेळी नकोशी असायची. ती सांभाळण्याचे काम त्यांनी सुरू केले. पुढे ही मुलं स्वत:च्या घरात आणून त्यांच्यासाठी स्वत:च्या घरातच वसतिगृह सुरू केले. पुढे या महिलांच्या मुलांना एड्सची लागण झाल्याचे कळाल्यानंतर स्वत:ची बायको गर्भवती असतानाही त्या मुलांनाही त्यांनी स्वत:च्या घरात आणले आणि त्यातून स्नेहालयाची निर्मिती झाली. प्रथम एकट्याने आणि पुढे मित्रांच्या मदतीने सुरू केलेले काम आज देशातले अशा प्रकारचे पहिले काम ठरले आहे. १९८९ साली सुरू झालेल्या या कामाला आज ३१ वर्षे झाली आहेत. वेश्या व्यवसायातील महिलांना आधार देणारा स्नेहज्योत, झोपडपट्टीतील निराधार मुले, मुलींसाठी बालभवन, रस्त्यावर सोडून दिलेल्या नवजात बालकांचा सांभाळ करणारा व दत्तकविधान केंद्र म्हणून देश-विदेशात नावाजलेला स्नेहांकुर प्रकल्प, संकटात सापडलेल्या मुला-मुलींसाठी काम करणारा चाइल्ड लाइन प्रकल्प, निराधार मुला-मुलींसाठी इंग्लिश मीडियम स्कूल, एचआयव्हीग्रस्त, पीडितांवर मोफत उपचार करणारा दवाखाना, मुला-मुलींना स्वयंभू बनविणारा पुनर्वसन प्रकल्प, ४० एकरावर वसविलेले हिंमतग्राम, १८ वर्षांवरील मुला-मुलींना विविध प्रशिक्षण देऊन त्यांच्या पायावर उभे करणारे जीकेएन सेंटर, शेती मार्गदर्शन केंद्र, पैठणी स्वयंरोजगार केंद्र, परिचारिका सेंटर, कम्युनिटी रेडिओ सेंटर, निराधार महिलांसाठी स्नेहाधार असे प्रकल्प स्नेहालयच्यावतीने चालविण्यात येतात.
ौ. कांचन परुळेकर / स्वयंसिद्धा / कोल्हापूर / महिला बचत गटासाठी काम स्वयंसिद्धा संस्था १३६ महिलांना एकत्र करून सुरू झाली. आजपर्यंत स्वयंसिद्धाने ९ हजार शहरी, ३० हजार ग्रामीण महिला आणि १५० उत्तम कार्यकर्त्यांचा मधुकोश विणला आहे. महिलांनी बनवलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून १९९४ मध्ये स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेची स्थापना केली. आज संस्थेची वार्षिक उलाढाल ३ कोटी इतकी आहे. संस्थेतर्फे ट्रेनिंग ऑफ व्हील, मोबाइल बझार याद्वारे साहित्याची विक्री केली जाते. शिवाय शहरात स्वतंत्र शॉपी सुरू आहे. करनूर (ता. कागल जि. कोल्हापूर) येथे स्वयंनिर्भरता निवासी संकुल उभारण्यात आले असून, येथे महिलांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबरोबरच त्यांचा सर्वांगिण विकास आणि क्षमता संवर्धनाचे काम करीत स्वयंसिद्धा संस्थेने १० हजारांहून अधिक महिलांना स्वयंपूर्ण केले आहे. संस्थेच्या संचालिका कांचन परुळेकर यांनी ही धुरा सांभाळली आहे. तळागाळातल्या महिलांना शैक्षणिक ज्ञान, सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन, व्यवहारज्ञान, त्यांच्यातील कलाकौशल्याला उद्योगात परिवर्तीत करीत अनेक उद्योजिका निर्माण केल्या. गरीब कुटुंबात जन्मलेल्या कांचनताई वयाच्या १३ व्या वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर होत्या. बँक मॅनेजरची नोकरी सोडून त्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिले. आई उद्योजिका बनली तर पुढची पिढी उद्योजक बनेल हा विश्वास या कामाच्या मागे आहे. दहावी नापासांसाठी चालवण्यात येणाऱ्या स्वयंसिद्धा स्कूलद्वारे दरवर्षी ३० मुलींना स्वयंसिद्ध केले जाते. स्वयंपूर्णा प्रकल्पाद्वारे ग्रामीण युवतींना व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. आठवडा बाजार, दरमहा प्रदर्शने, वर्षाला चार मोठी प्रदर्शने आयोजित करून लाखोंच्या साहित्याची विक्री केली जाते. माणिकमोती प्रकल्पांतर्गत गरजू उद्योजिकांना साधने, मशिनरी, कच्चा माल, बाजारपेठेत स्टॉल मांडणी अशी मदत केली जाते. महिलांच्या लैंगिक आरोग्याची काळजी, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, स्वसंरक्षणाचे धडे, आरोग्य तपासणी असे उपक्रम घेतले जातात. कृषी प्रकल्पात सामुदायिक शेती, कंत्राटी शेतीस गांडूळ खत निर्मिती, फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, बियाणे बदल, कुक्कुटपालन, शेळीपालन, शेती अवजारे पुरवणे यात मूलभूत काम केले आहे. संस्थेने आजवर कोणतीही शासकीय मदत घेतलेली नाही. उलट शासकीय विभागांतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेच्या महिला कार्यकर्त्या जातात.
रामभाऊ इंगोले / विमलाश्रम / ३० वर्षांपासून वेश्या व त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचे कार्य ‘विमलाश्रमा’त वाढलेल्या १३ मुलींचे लग्न, ८ मुलांनी लहानमोठे व्यवसाय, येथून शिकून गेलेली २० ते २२ मुले विविध ठिकाणी नोकरीवर, ५ मुलींनी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण, एक मुलगी बीएएमएसचा अभ्यास करतेय असे विमलाश्रम या संस्थेच्या माध्यमातून रामभाऊ इंगोले यांचा बँक बॅलेन्स तयार झाला आहे. आज या संस्थेत ४०च्या वर मुला-मुलींचे वास्तव्य असून त्यातील काही पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. देहव्यवसायात अडकलेल्या महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष करताना त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचा वसा घेऊन रामभाऊ इंगोले यांनी बदनाम वस्तीतील मुलांच्या संगोपनासाठी आयुष्य समर्पित केले. १९८० पासून गंगाजमुना वस्तीतील देहव्यवसायाच्या क्षेत्रातील महिलांच्या हक्कासाठी त्यांनी संघर्ष सुरू केला. यादरम्यान त्यांनी त्या वस्तीतील चार मुले स्वत:च्या घरी आणली. या कृतीमुळे घरच्यांचा टोकाचा विरोध सहन करावा लागला. त्यांना घरातून बेदखल व्हावे लागले. या मुलांना घेऊन भाड्याच्या घरात बालसंगोपन सुरू झाले. मुलांची संख्या वाढत गेली. चारचे १५ आणि १५ ची २५ मुले त्यांच्या घरी गोळा झाली. त्यामुळे भाड्याचे घरही सोडावे लागले. त्यातून मित्र आणि संवेदनशील नागरिकांच्या मदतीने ‘विमलाश्रमा’ची निर्मिती झाली. शासकीय मदत न घेता लोकसहभागातून त्यांचे कार्य चालले. केवळ संगोपन नाही, तर ही मुले भविष्यात सक्षम व्हावीत, म्हणून शिक्षणाचे दरवाजे उघडून दिले. २००० साली नागपूरजवळ उमरेड रोडवरील पाचगाव, सुरगाव, चिमणाझरी व डोंगरगाव येथे दगडाच्या खाणीत छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश राज्यातील मजुरांच्या मुलांसाठी दर रविवारी झाडाखाली ‘संडे स्कूल’ सुरू केले. २००२ साली अर्धवेळ आनंदशाळा, २००३ पासून विमलाश्रमातील तरुणीने दगडी खान क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी जनजागृती अभियान, २००५ साली अनाथ मुले व स्थलांतरित दगडी खान मजुरांच्या मुलांसाठी निवासी शाळा व २००७ पासून प्रत्यक्ष शाळा उभारणी केली. आज १३३ मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था येथे झाली आहे. २०११ साली ग्रामीण भागातील गरीब मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षणाची व्यवस्था. २०१८ पासून ज्येष्ठ नागरिकांच्या निवासासाठी ‘स्नेहसदन’ निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. २०१९ मध्ये शहराजवळच्या वाठोडा गावी धुंडा मारोती देवस्थानात दर शनिवारी स्वच्छता अभियान सुरू केले. मंदिरात जेवणावळीचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या या उपक्रमातून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे.
विश्वास गोरे / आधार / बदलापूर-इगतपुरी / गतिमंद मुलांचा आयुष्यभराचा सांभाळ करणारी संस्था बदलापूरच्या संस्थेच्या २३५ तर नाशिकच्या संस्थेत १०० अशा ३३५ गतिमंद प्रौढ पुरुष आणि महिलांचा सांभाळ करणाही ‘आधार’ ही देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे. आपल्यानंतर आपल्या या गतिमंद मुलांचे काय होणार? ही अशा मुलांच्या पालकांची चिंता या संस्थेच्या निर्मितीस कारण ठरली. १८ ते ७५ वर्षे वयोगटातील गतिमंद येथे आहेत आणि गेल्या २६ वर्षांत या संस्थेत जवळपास ८० गतिमंदांनी शेवटचा श्वास घेतला आहे. या गतिमंदांची सेवा करण्यासाठी म्हणून ‘आधार’ सेवेसाठी २४० कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याचेही काम या संस्थेने केले आहे. शासनाचे कोणतेही अनुदान नाही. वर्षाचा खर्च जवळपास ७ कोटी रुपये. त्यात पालकांकडून फीपोटी फक्त ६० ते ६५ टक्के रक्कम मिळते. उरलेली ४० टक्के रक्कम दरवर्षी जनतेच्या दातृत्वातून उभी करण्याचे काम ‘आधार’चे अध्यक्ष विश्वास गोरे संचालक मंडळाच्या मदतीने करीत आहेत. आपल्या पश्चात आपल्या विशेष मुलाची कोणीही काळजी घेणार नाही या चिंतेने ग्रस्त झालेल्या एका आईने आपल्याच मुलाची हत्या केल्याची बातमी वृत्तपत्रात वाचून मन सुन्न झालेल्या माधवराव गोरे यांनी विशेष मुलांच्या पालकांना एकत्र घेऊन ‘आधार’ संस्था स्थापन केली. ते स्वत: मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटी, माटुंगा या संस्थेत अपंग सेलचे प्रमुख होते. विशेष मुलांची कायमस्वरूपी काळजी घेण्याच्या विचाराने त्यांनी काम सुरू केले. १७ जानेवारी १९९४ रोजी बदलापूर-बारवी मार्गावर चरगाव परिसरात असलेल्या सागाव येथे माधवराव गोरे यांनी ‘आधार’ ही संस्था सुरू केली. राज्यात अशा प्रकारच्या २० संस्था आहेत. ज्यांच्या घरात कोणी ना कोणी गतिमंद आहे अशांच्या पालकांनी या संस्था सुरू केल्या आहेत. मात्र माधवराव गोरे यांनी त्यांच्या घरात कोणीही असे मूल नसताना ही संस्था स्थापन केली आणि आता त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विश्वास गोरे हे काम पाहत आहेत. संस्थेला फी म्हणून मदत करणाऱ्या पालकांचे वय झाल्याने त्यांची आर्थिक क्षमता कमी झाली आहे. संस्थेचे मुख्य आर्थिक स्रोत पालक असल्याने तेच कमजोर झाल्यामुळे लोकसहभागातून जास्तीतजास्त मदत गोळा करत ही संस्था चालू आहे. अनेक गतिमंद केंद्रांत फक्त लहान मुलांनाच ठेवण्यात येते. मात्र आधार ही संस्था अशी आहे की त्या ठिकाणी प्रौढ पुरुष आणि स्त्रियांनादेखील ठेवले जाते. त्यांचा योग्य सांभाळदेखील केला जात आहे. तसेच त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जात आहे.